माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग

          माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग


                नमस्कार मित्रहो,.......       
मी तुमच्यातलाच एक सर्वसाधारण विद्यार्थी आहे. मी सातपुड्यामधील अक्कलकुवा तहसील या अतिदुर्गम भागातील आहे. माझा जन्म मोलगी परिसरातील एका छोट्याशा खेड्यापाड्यात म्हणजे कंजाणी या गावात झाला.आम्हा भावंडामधील सर्वात मोठी बहीण त्यानंतर मी माझ्यानंतर चार भाऊ असं आम्ही पाच भाऊ, एक बहीण आणि आईवडील असा आमचा कुटुंब आहे.
मी पहिले कधीही लेखन केले नाही आणि कधी लेखन करण्याचा प्रयत्न सुद्धा केले नाही. परंतु आज मी लेखन करण्याचा प्रयत्न करत आहे. माझे हे प्रथम लेखन मी माझ्या जीवनातील कधीही विसरता येणाऱ्या अशा घटने विषयी म्हणजे अविस्मरणीय क्षणाविषयी करत आहे.
आपण लहान वयात होतो त्यावेळेस कसलीही पर्वा, कसलीही चिंता, कोणाचीही काळजी आपल्या0ला नसायची; दुसऱ्याचं तर सोडाच आपल्याला आपलंच ठाऊक नसायचं. त्या वयात आपण जे चांगलं वाटेल ते करायचं. मग काहीही असू द्या. आपण लहानपणी खोडकरवृत्तीचे असायचं. मीही त्याच प्रमाणे खोडकरवृत्तीचा होतो. आता आपल्याला लहानपणातील सर्वच प्रसंग आठवतील असं नाही, पण असे काही प्रसंग असतात की आपण त्या प्रसंगांना कधीच विसरत नाही. घरातील वातावरणाच्या बाबतीत असो वा जीवन मरणाच्या बाबतीत असो किंवा मान-अपमानाचा असो माझ्या जीवनात ही असे अनेक प्रसंग घडलेत. त्यातील एक प्रसंग तर जीव घेणाच होता. तो प्रसंग माझ्या जीवनात अविस्मरणीय क्षण बनून आजही माझे रोमटे उभे करून जातो.
माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणजे मृत्यूच्या तावडीतून सुटका हा होय. हा क्षण २००४ साली माझ्या जीवनात आला. २००४ या वर्षी तसे तारीख महिना नीट आठवत नाहीत, परंतु मला जसे आठवते त्याप्रमाणे तो दिवाळीच्या सुटीचा काळ असावा. त्यावेळेस मी सहावीच्या वर्गात शिकत होतो. हा प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही. त्यावेळेस माझा जीव सुद्धा गेला असता, पण मी दुर्दैवाने वाचलो... हे माझे नशीबच म्हणावे लागेल.
दिवाळीच्या त्या सुट्यांमध्ये आम्ही एकदा नदीवर अंघोळीला जाण्याचं विचार करत होतो. सुट्टीचे दिवस म्हणजे खेळणे, मज मस्ती करणे तर कोणी मामाचा गावाला जात. मी कधी मामाचा गावाला गेलं नाही, पण मी माझे दोन लहान भाऊ सुनिल, राहुल आणि मित्र रोशन आणि रोहित हे दोघे भाऊ आणि वर्गमित्र ईश्वर असे आम्ही सहा जण मिळून कुठल्यातरी एखाद्या नदीवर जाऊन अंघोळ करण्याचे ठरवले आणि आम्ही एकेदिवशी दुपारचे १२ किंवा एक वाजले असतील मोलगीहून दोन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका नदीजवळ गेलो.
नदीच्या ठिकाणी गेलं म्हणजे सर्वांनाच पोहणे हा शब्द आठवतो. नदीमध्ये अंघोळ करणे म्हणजे मौज-मजेची आवडीची गोष्ट होय. पोहून खेळणे, डुबकी मारून खेळणे, कोण खूप उंचीवरून उडी मारत, तर कोणी कमी उंचीवरून, कोण काय प्रकार करेल याचा नेम नसतो. तसेच कोण वेगात पोहतो यावर शर्ती (स्पर्धा) लावून खेळणे किंवा एकमेकांना टिपून खेळणे असे अनेक प्रकारचे खेळ नदीवर अंघोळीला गेलेले मुलं खेळत असतात. नदीवर जाऊन अंघोळ करणे, पोहणे ही सर्वांचीच आवड असते. यातील काहींना पोहता येतं तर काहींना पोहता येत नाही. ज्यांना-ज्यांना पोहता येतं ते तर नदीत उडी टाकून पोहण्याचा आस्वाद घेऊन नदीत खेळत असतात आणि ज्यांना पोहता येत नसतं ते नदीच्या काठावर बसून अंघोळीच्या आस्वाद घेत असतात.
अशाच प्रकारे विचार आमच्या मनातही येत होते आणि आम्ही काही मित्रमंडळी मिळून नदीवर अंघोळीसाठी गेलो. ती नदी मोलगीहून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर होती. त्या नदीचे नाव कुनपावा असे होते (आम्ही आमच्या भाषेत कुनपावाकुंड असे म्हणत.)  कुनपावा ही नदी बाराखाडीला (बारानदी) जोडून आहे. बाराखाडी म्हणजे बारा नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण किंवा बारा नद्यांच्या संगम असे म्हणता येईल. तर आम्ही मी माझे दोन लहान भाऊ सुनिल, राहुल आणि मित्र रोशन आणि रोहित हे दोघे भाऊ आणि वर्गमित्र ईश्वर असे आम्ही सहा जण मिळून त्या नदीवर अंघोळ करण्यासाठी गेलो. माझा वर्गमित्र ईश्वर हा पोहण्यात पटाईत होता. त्याच्या पाठोपाठ मित्र रोशन आणि माझा लहान भाऊ सुनिल हे दोघेही पोहण्यात पटाईत होते. मला तर पोहण्याच्या बाबतीत नॉलेज फारच कमी होता. मी पोहण्यात पटाईत नव्हतो तरी पोहण्यात पटाईत असल्याचे त्यांना  जाणवत होतोयाचे कारण असे की, मी त्या सर्वांमध्ये वयाने मोठा होतो. म्हणून मी त्यांना भासवले होते की, मीही पोहण्यात पटाईत आहे. राहुल आणि रोहित हे दोघे तर फारच लहान यांना तर पोहणे हा प्रकार काय आहे हे सुद्धा नीट माहीत नव्हते.
ती लहानशी अशी नदी होती, परंतु फार खोल होती. अंदाजे २० फुटा इतकी खोल असावी किंवा त्या पेक्षाही अधिक खोल असावी. त्या नदीला आम्ही कुनपावाकुंड असे म्हणत. तिथे गेल्यावर आम्ही आपापले कपडे काढून ठेवले आणि माझे मित्र ईश्वर, रोशन आणि भाऊ सुनिल यांनी एकापाठोपाठ एक अशा क्रमाने नदीत उडी घेतली. मी नदीत उडी घेऊ का नको असा विचार करत होतो, तेवढयात नदीत उडी घेतलेल्यांनी काय करतंय... लवकर घे की उडी म्हटले... आणि मीही उडी घेतली. आम्ही नदीत पोहण्यात-खेळण्यात गुंग झालो. भाऊ राहुल आणि मित्र रोहित हे दोघे तर गुडघ्याला येईल इतक्या पाण्यात पोहून खेळत होते. आम्ही सर्व जण त्या नदीत खेळण्यात गुंग झालो. आणि आम्ही खेळता-खेळता या तळापासून त्या तळापर्यंत कोण लवकर पोहचतो अशी शर्यत (स्पर्धा) लावली. "जो जिंकेल तो सिकंदर आणि जो हरेल तो बंदर" असे आमच्या शर्यतीचे ब्रीदवाक्य ठरले होते. पाहता-पाहता आमच्यातली ही स्पर्धा सुरू झाली. सर्वांचीच लवकर पोहचण्याची घाई होती, सर्वांच्या मनात मीच लवकर पोहचून सिकंदर होणार असे होते. मी सर्वात वेगाने पोहत होतो, पण तळाशी लागून. माझ्या पुढे ईश्वर का रोशन पुढे जाऊ लागला. त्याला मागे टाकण्यासाठी मी जोर-जोरात हात-पाय चालवू लागलो. पुढे जाण्याच्या नादात माझा पाय दुर्दैवाने एका दगडावर आदळला आणि माझे संतुलन बिघळून पाण्यात जिथे जास्त खोल होते त्या ठिकाणी ढकलला गेलो. मला पोहता जरी येत होते तरी मी पूर्णपणे पोहू शकत नव्हता कारण मी पोहण्यात पटाईत नव्हतो. त्यामुळे नदीत जास्त खोल होते त्या ठिकाणी फेकल्या गेल्याने मी बुडू लागलो. मला त्या खोल पाण्यातून बाहेर निघता येईनासे झाले आणि मी बुडू लागलो. जेव्हा मी बुडू लागलो होतो तेव्हा माझ्या भावंडांना मित्रांना मी बुडण्याचे नाटक करत असल्याचे वाटत होते. त्यांना काय माहित की, मी खोल पाण्यात फेकल्या गेल्याने मला त्या खोल पाण्यातून निघता येईनासे झाले होते. खरं तर मी त्या नदीतील खोल पाण्यात अडकलेला होतो. मी त्या खोलपाण्यातून जस-जसा निघण्याचा प्रयत्न करत होतं तस-तसा आणखीन खोल पाण्यात अडकत जात होतो. आणि माझे भाऊ मित्र माझ्याकडे पाहून हसत होते. त्यांना काय माहित मी नाटक करतोय की खरंच बुडतोय. मी डुबकी घेत होतो,    हा...    हा...    हा...    करत आणि माझे लहान भाऊ मित्र गमतीने हसत होते.
वाह छान! ...
मस्त रे... आणि वाह वाह करत होते.
आणि
हसत होते कधी    हाहा... करत तर कधी    हीही... करत.
असे त्यावेळचे क्षण पाहण्यासारखेच होते; पण ते क्षण मला माझ्या जीवनातील अंतिम क्षण वाटू लागले होते. मी माझ्या मनात निश्चय करून घेतला की, आता आपल्या जीवनातील हे शेवटचे म्हणजे अंतिम क्षण आहे. यावेळी मला कोण वाचवणार... वाचवणारे आहे त्यांना तर मी नाटक करत असल्याचे वाटत आहे. ते तर मी डुबक्या घेत असल्याचे पाहून खुदू-खुदू हसत आहे... मजा घेत आहे... जवळपास ते मिनिट झाले असावे. मला वाटले हे काय वाचवणार मला... या विचाराने मी माझे जीवन संपवण्याच्या संकल्प केला होता आणि शेवटची डुबकी घेणारच होतो, पण तेवड्यात सर्वांना कळून चुकले की, हा तर खरंच बुडत आहे. बुडण्याचं नाटक केलं असतं तर एवढ्या वेळे पर्यंत केलं नसतं. माझ्या वर्गमित्राने वेळ लावता पाण्यात उडी घेऊन मला वाचवण्यासाठी पुढे आला. जीव वाचवण्यासाठी मी ही पटकन त्याचा हात धरला आणि बाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागला. माझ्या या जीववाचवण्याच्या घाईघाईने केलेल्या प्रयत्नाचा परिणाम असा झाला की, मला वाचवण्यासाठी आलेला माझा वर्गमित्रही पाण्यात बुडू लागला. पण तेवढ्यात हे सर्व प्रकरण पाहून दुसऱ्यांनी पाण्यात उडी घेतली आणि आम्हा दोघांना वाचविले. त्या सर्वांनी मला खेचून पाण्याबाहेर काढले. जसे मला पाण्याबाहेर काढले तशाच स्थितीत काही वेळ मी पडून राहिलो.
त्यावेळी मी मरता-मरता वाचलो. सर्वजण पाण्याबाहेर येऊन रडकुंडीला आले. डोळ्यात पाणी आणून म्हणाले लक्ष्यादादा आज या ठिकाणी मेला असता तर काय झाले असते... घरच्यांनी तर आपल्याला मारूनच टाकले असते... असे विचार सर्वांच्या मनात येऊ लागले. तसेच ते कधी एकमेकांकडे पाहत तर कधी माझ्याकडे पाहत. त्या सर्वांचे भरलेले डोळे पाहून मी हसू लागलं आणि ते ही हसू लागले. हसता-हसता मी त्यांना म्हणालंसाले तुम्ही मला पाण्यात बुडताना पाहून हसत होते आणि आता मला वाचवून रडकुंडीला आलात. हसा अजून खुदू-खुदू!... अरे!... हसा ना!... माझ्या या बोलण्यावर सर्वजण आणखीनच जोर-जोरात हसू लागले... आणि मलाही हसवले... आम्ही सर्वजण मिळून घडलेलं सर्वकाही विसरून जोर-जोरात हसू लागलो थोडा वेळ त्या नदीजवळ थांबून निघून आलो.
एवढे काही घडले तरी आम्ही त्या नदीहून दुसऱ्या नदीकडे अंघोळीसाठी गेलं होतो. त्या दुसऱ्या नदीचे नाव कोडहोरक्या असे होते. (कोडू म्हणजे घोडा. होरकीत म्हणजे घसरून. कोडू आणि होरकीत हे दोन शब्द मिळून कोडहोरक्या हे नाव पडले आहे. कोडू आणि होरकीत हे दोन शब्द भिलोरी या आदिवासी बोलीतील आहे. कोडहोरक्या हे नाव घसरून पडलेल्या घोड्याच्या निशाण्यावरून पडलेले आहे. आमचे पूर्वज या ठिकाणी शिवाजी महाराजांचा घोडा घसरून पडला होता असे म्हणतात.) घडलेल्या घटनेमुळे आम्ही सर्वांनी ठरवलं की जास्त खोल पाण्यामध्ये अंघोळ करायची नाही. पण कोडहोरक्या या ठिकाणी आम्ही जास्त वेळ थांबलं नाही.
या माझ्या जीवनातील अविस्मरणीय घटना वा क्षणात मी मृत्यूला तर पाहू शकलो नाही, पण मृत्यू कसा असतो, केव्हा येतो, हे नक्कीच मला त्यावेळेस जाणवले होते. हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण त्या लहानशा वयातला असला तरी मी कधीही विसरू शकत नाही. जेव्हा-जेव्हा मला या क्षणाची आठवण येते, त्यावेळेस माझे रोमटे उभे राहून जातात आणि माझ्या मित्रांची आठवण येते तेव्हा डोळे भरून येतात.
जीवन मरण प्रत्येक सजीव प्राण्याला आहेच नाही असं नाही. हा तर प्रकृतीच्या नियमच आहे, पण मृत्यूच्या दारी जाऊन परत येणे फारच कठीण आहे. मला मृत्यूच्या दारातून परत आणणाऱ्या माझ्या मित्रांच्या भावंडांचाही मी कृतज्ञ आहे. मला वाचवणाऱ्या मित्रांना मी कधीच विसरणार नाही. आता जगत असलेले जीवनही माझ्या मित्र भावंडांमुळेच मला लाभलेले आहे.
             
          luckyvasave79@gmail.com

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझी छम-छम